पाणीदार मोती
माळरानावर गुरे चरत होती. मेंढ्यांचा
कळपही चरत चरत फिरत होता. गुराखी आणि मेंढपाळ गप्पा मारत उभे होते. इतक्यात एक जण
ओरडला,
"पळा रे, पळा. ते बघा धुळीचे लोट. लप्कर
आलं. पळा. गुरंढोरं बाजूला घ्या. मेंढ्या पळवा. चला, चला.
ती आरोळी ऐकताच सारी गडबड उडाली. सर्वांनी
आपापली गुरेढोरे आणि मेंढरे बाजूला नेली. भीतीने सारे जण दडून बसले. एक मेंढपाळ मुलगा
मात्र लपला नाही. तो काठी सावरून तेथेच उभा राहिला.
“ मल्ल्या, मल्ल्या,
अरं ए मल्ल्या, तिथं नगो उभा राहूस. लष्कर जवळ
आलंय बघ. घोड्यांच्या टापांखाली चेंगरून मरशील.” अशा आरोळ्या बाकीच्यांनी दिल्या;
पण मल्ल्या बाजूला हटला नाही. पाय रोवून तो तेथेच उभा राहिला.
मल्ल्या रागाने लालभडक झाला होता. त्याचे
ओठ थरथरत होते. लष्कर जवळ येताच त्याने हातात एक भले मोठे ढेकूळ घेतले. घोडेस्वार
अगदी जवळ आले. डोक्याला लाल मुंडासे, हातात
भाला, कमरेला तलवार आणि पाठीवर ढाल अशा थाटात ते स्वार दौडत
येत होते. ते पेशव्यांचे सैनिक होते.
आघाडीचा स्वार गोरापान होता. तो अंगाने
भरदार होता. त्याच्या डोक्यावर मोत्यांचा शिरपेच होता. त्याचा पांढरा शुभ्र ऐटदार
घोडा जवळ येताच मल्ल्याने नेम धरला आणि हातातील ढेकूळ त्या स्वाराच्या रोखाने
जोरात फेकून मारले.
अचानक ढेकूळ अंगावर येताच तो स्वार चमकला.
त्याने आपला घोडा जिथल्या तिथे उभा केला. रागाने त्या मुलाकडे पाहून विचारले,
“कोण रे तू ? नाव काय तुझं ?"
त्या स्वाराच्या दरडावण्याला मल्ल्या
मुळीच भ्याला नाही. किंचितही न डगमगता तो म्हणाला, "मला मल्ल्या म्हणतात ! मुलाची ही धिटाई पाहून त्या स्वाराला मोठे नवल
वाटले. कौतुकाने तो स्वार त्याच्याकडे पाहातच राहिला. त्याने पुन्हा दरडावून
विचारले, “तू ढेकूळ का मारलंस ?”
न भिता मल्ल्या म्हणाला,
“ मारणार !”
" म्हणजे ?”
" तुम्ही सैनिक लोक आमच्या
शेतांतून जाता, बेधडक पिकं तुडवता, पिकांची
नासाडी करता; मग का मारू नये ढेकूळ तुम्हांला ?"
मल्ल्याचे हे उत्तर,
त्याचा बाणेदारपणा आणि त्याची धिटाई या सगळ्यांची त्या स्वारावर
चांगलीच छाप पडली. तो स्वार कोणी साधा स्वार नव्हता. तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष
बाजीराव पेशवेच होते ! त्या मुलाला चांगले न्याहाळून ते पुढे निघून गेले.
त्या रात्री त्या सैन्याचा मुक्काम त्याच
गावी पडला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मल्ल्याच्या घरी पेशव्यांचे बोलावणे आले.
प्रत्यक्ष पेशव्यांचेच बोलावणे आले म्हणून त्याचा मामाही त्याच्या- बरोबर गेला.
मल्ल्याने कालचा शेतात घडलेला प्रकार आपल्या मामाला वाटेत सांगितला. त्याचा मामा
तर अगदी गांगरून गेला. दोघेही पेशव्यांच्या तंबूत गेले. बाजीराव पेशव्यांपुढे
मल्ल्याचा मामा अत्यंत अजिजीने म्हणाला, “सरकार,
गुन्हा माफ करा. लेकरू आहे. त्याला आईबाप नाहीत. मीच सांभाळतो. '
'कुठला राहणारा हा मुलगा ?” असे बाजीरावांनी विचारले, तेव्हा मामा म्हणाले,
" हा होळचा राहणारा. ' "
" ठीक आहे. पोर मोठा तेज आहे. याला
आता आम्ही संभाळणार ! काय मल्हारी, येणार ना आमच्या सैन्यात ?"
असे बाजीराव पेशव्यांनी विचारले, तेव्हा 'जी' म्हणून त्याने पेशव्यांना लवून मुजरा केला.
बाजीरावांनी त्याची पाठ थोपटली.
हुजऱ्याने पोशाख आणला. मल्हारीस दिला.
मामाचे डोळे ओलावले. बाजीराव पेशवे म्हणाले, “आज
आम्हांला खरा पाणीदार मोती सापडला !"
पुढे याच मल्ल्याचे मल्हारराव होळकर झाले
!
1 Comments
छान ऐतिहासिक कथा
ReplyDelete