चतुर बिरबल
एकदा शिवराम नावाचा एक गवळी आपली गाय घेऊन
बाजारात निघाला. वाटेत त्याला त्याच गावचा शंकर नावाचा गवळी भेटला. दोघेही गप्पा
मारीत बाजारात गेले. तेथे शंकरच्या मनात आले कपट. त्याने दांडगाईने शिवरामची गाय
आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला.
शिवराम ऐकेना. तेव्हा शंकरने त्याला खूप मारले आणि बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात
गेला.
बिचारा शिवराम शहरात आला आणि त्याने
बादशहाकडे तकार नेली. बादशहाने ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले. बिरबलाने सर्व हकीकत
ऐकून घेतली. शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दुसऱ्या दिवशी दरबारात येण्यास
सांगितले.
दुसन्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर
बिरबलाने शंकरला विचारले, "काय रे, ही गाय कुणाची ?" तो म्हणाला, “सरकार, ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ
घेत आहे."
ते ऐकून बिरबलाने शिवरामला गाईचे नाव
विचारले. त्याने हरिणी असे तिचे नाव सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला,
"तुम्ही आता पन्नास पावलं दूर जाऊन उभं राहा आणि दोघेही 'हरिणी' म्हणून या गाईला हाका मारा.”
त्याप्रमाणे ते दोघे पन्नास पावले दूर
गेले. दोघांनीही गाईला हाक मारली. त्याबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी
राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली.
ते पाहून बिरबलाला खरा मालक कोण व चोर कोण,
ते समजले. तरी आणखी खात्री करण्याकरता तो त्यांना म्हणाला,
" आता तुम्ही दोघं पाठ फिरवून सरळ चालू लागा, एक उजव्या बाजूने आणि दुसरा डाव्या बाजूने. "
त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ
शिवरामच्या मागोमाग चालू लागली.
ते पाहिल्याबरोबर बिरबलाने शंकरला दरडावून
विचारले,
'काय रे, तू
दुसऱ्याची गाय घेऊन वर खोटं बोलतोस ?
शंकर काय बोलणार?
त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. बिरबलाने शिवरामला त्याची गाय
घेऊन जाण्यास सांगितले आणि शंकरला शिक्षा केली.
1 Comments
सुंदर कथा
ReplyDelete