मराठी कथा- कसरत
आपण सतत मराठी कथा Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी वाचनीय लेख शोधत असता. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील अतिशय भावनिक कथा पाहणार आहोत. मुलावर संस्कार व्हावेत यासाठी वाचनीय कथा, गोष्टी, वाचनीय लेख वाचन करणे आवश्यक असते.
कसरत
दादासाहेब मोरे (दादासाहेब मल्हारी मोरे
जन्म : १९६१ ) भटक्या व विमुक्त जमातींच्या उद्धारासाठी झटणारे कार्यकर्ते. 'गबाळ' हे आत्मकथन, 'दुस्काळ' ही कादंबरी आणि 'विमुक्त'
हा कथासंग्रह ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. 'कसरत' ही कथा 'विमुक्त'
या पुस्तकातून घेतलेली आहे. या पाठात भटक्या विमुक्तांच्या जीवनातील
विदारक दुःखाचे चित्रण केले आहे.
सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्यातुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन, उमश्या व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती. बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जरमनची दोन फुटकी भगुली, तीन-चार काळपट ताटल्या, एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळल ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणार साहित्य होत. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलगं अडकवलं होतं. त्याच्याबरोबर लक्षी दोन लांब वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडे, अणकुचीदार लोखंडी सळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती. दोन फाटकी पोती, सतरा भस्कं पडलेली वाकळ थोडीफार फाटकी- तुटकी कापडं या सर्वांचं गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं. उमश्या मातीची घागर आणि काही लहानसहान साहित्य घेऊन चालत होता. बानी त्यांच्याबरोबर पळत होती. उन्हाचा जोर जसजसा वाढू लागला तसतसं उमश्याला आणि बानीला चालणं जमेना झाले. उन्हामुळे जमीन तापू लागली. त्यांच्या अनवाणी पायाला चटके बसू लागलं. ऊन चांगलंच वाढलं. त्यांच्या भुकेनं व्याकळ झालेल्या चेहन्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. बानी रडू लागली. रडत रडत ती म्हणत होती, "आय... मला चालाला येत न्हाय... पाय भाजाय लागल्याती...'
लक्षीनं मुलीकडं बघितलं. तिच्या
डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, "त्या.... ततं
गेल्यावर गाव येतंया. ततं गेल्यावर ख्योळ कराचा हाय... तवर चाल. "
पाय आपटत उमश्या म्हणाला,
"मला... भूक लागल्याय... आजून चालाचं हाय... ?" केवड..... लक्षी चालता चालता उभी राहिली. तिनं उमश्याला जवळ येऊ दिलं.
त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली.
"बाबा... ख्योळ केला म्हंजी...
आपणाला भाकर मिळतीया... पयसं मिळत्याती.... मग भाकर खायाची... येवडं गाव यीव पातूर
चाल... म्हंजी तुला धा पयसं दिती....." आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं,
उमश्या उत्साहानं म्हणाला, "मला पयसं...
दितीयाच... ? मग चालतू..."
लगेच बानीनं सूर लावला,
"आय... मला... न्हाय पयसं देत... ?" लक्षी स्वतःशीच हसली. डोक्यावर वेळूच्या काठ्या सरळ करत म्हणाली, 'व्हय... बाय... तुला बी पयसं दिती..."
बंड्या बराच पुढं गेला होता. 'रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथं खेळ करावा. लेकरं सकाळपासून उपाशीतापाशी
चालायला लागलीत. खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही' या विचारातच तो भराभर चालत होता. त्यानं मार्ग वळून बघितलं. लक्षी आणि
मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं. तो खाली बसला.
लक्षी मुलांना समजावत घेऊन आली. दोन्ही मुलं रडत होती. लक्षी नवऱ्याला म्हणाली,
"आवं... लेकर... भुकेनं हैराण झाल्याती.... उनातानाचं चालून
पेकाळल्याती... कसं कराचं ?"
"हितनं मैलबर चाललं म्हजी कुमट गाव
येतंया... ततं जावून ख्योळ करू म्हण हितं वाटेतच बसून काय कराचं ? पोटाला काय खायाचं ?
एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्षी
म्हणाली,
"लेकरं भेलकांडाय
लागल्याती... माजं सुदीक पाय मेटाकुटीला
आल्याती आणिक आशातच कसा ख्योळ कराचा जीव नगुसा झालाय..."
बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा
पुटपुटला,
"न्हायतर आपल्या पोटाला कोण दील ?" लक्षी
आपल्या विचारातच चालत होती. उमश्या आणि बानी रडत, पाय आपटत
आईबापाच्या मागं चालत होती.
दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची
तीव्रता थोड़ी कमी झाली होती. बंडयाचं कुटुंब कुमठे या गावाला आलं. काही माणसं
कामावरून,
शेतावरून घराकडं येत होती. गावातील भरवस्तीत बंड्याचं कुटुंब आलं.
मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला. लक्षीनं गाठोडी व्यवस्थित
ठेवली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली. बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे
साहित्य एकत्र करू लागला. दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली. ढोलगं
खांदयाला अडकावीत बंड्या लक्षीला म्हणाला, "त्या
पोरास्नी उटीव. तासबर कसातर ख्योळ करू. सांच्याला कुटंतर ऱ्हायाला जागा बगाला
पायजी."
झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जिवावर
आलं होतं. ती उठली, मुलांच्या जवळ गेली.
त्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत म्हणू लागली, "उटा
रं.. ! आपणास्नी ख्योळ कराचा हाय... तुमाला खायाला भाकर नगू का...? ख्योळ केला म्हंजी झोपा..."
भुकेनं व्याकूळ झालेली मुलं डोळं चोळत
उठली. बंड्यानं ढोलगं वाजवण्यास सुरुवात केली. ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं,
"डोंबाऱ्याचा ख्योळ आला" म्हणून पळत येऊ लागली. थकल्या
हातानं बंड्या ढोलगं वाजवत होता. ढोलग्यावर थाप मारतच तो म्हणत होता,
"ये पळा पळा... ख्योळ आला.... कोलांट्या उड्या... काटीवर हुबा
ऱ्हायाचं... या या...."
मुलं, बायका,
माणसं तिथं गर्दी करू लागली. लक्षी काठ्या, वर्तुळाकार
लोखंडी कडं, सळ्या, दगडं असं कसरतीसाठी
लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमश्यानं अंगातील फाटकी अंगराख काढली. बानी
आळस देत देत त्याच्याबरोबर उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला
जास्तच चेव आला. तो मोठ्यानं बडबडत ढोलगं वाजवत होता. बंड्या ढोलगं वाजवत म्हणाला,
"आता... ही पोरं... ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या
मारत्याली..." तो मोठ्यानं बडबडू लागला, "ह्ये
चला... चला..."
उमश्या आणि बानी ढोलग्याच्या तालावर
उलटसुलट उड्या मारू लागली. दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली. भुकेमुळं,
थकव्यामुळे भेलकांडून ती मुलं मध्येच पडत होती. जमलेली माणसं ही एक
गंमतच करतात म्हणून मोठमोठ्यानं हसत होती. बंड्याचं अंतःकरण तिळतिळ तुटत होतं.
लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास, हातावर
चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली. लक्षीनं एका गाठोड्यातून चिंध्या
काढल्या. त्या गोल लोखंडी कड्याच्या चारही बाजूंनी बांधल्या. त्या बांधलेल्या
चिंध्यांवर रॉकेल टाकले. त्या चिंध्या पेटवल्या. गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीनं
जाळ झाला. बंड्या जोराजोरानं ढोलगं बडवू लागला. एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार
कडं बांधून, लक्षीनं एका विशिष्ट उंचीवर धरलं. प्रथम
उमश्यानं त्या गोल कड्यातून उडी मारली. लक्षीनं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर
धरलं. त्या वेळी बानीनं त्याच्यातून उडी मारली. जमलेली माणसं आपापसांत कुजबुजत
होती,
"च्या मारी... किवडी पोरं हायती.
नुसतं फोकावानी लवत्याती. जाळातनं कसा आरपार सूर मारत्याती." माणसं आश्चर्य
व्यक्त करत होती; परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं,
की आता मुलांना काहीच करता येणार नाही. उपाशी पोटी त्यांना धड नीटसं
उभं राहता येत नाही. आपण त्यांना असंच काम करायला लावलं, तर
एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल.
बंड्यानं खांदयाला अडकवलेलं ढोल काढून
खाली ठेवले. त्यानं केळूची उंच काठी घेतली. ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या
माणसांनी,
मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. " आता ह्या
काटीवर... माजी बायकू... येका पायावर हुबी हाणार हाय....
तुमाला... आमच्या आंगातली कला दाखवतो...
पर..." तो दीनवाणा चेहरा करून, पुढं
बोलू लागला, “आमा गरिबाच्या पोटाला... थुडी..... थुडी...
भाकर आणि कोरड्यास आणून दया... आमच्या आतम्याचा तुमास्नी आशीरवाद लागील... लेकरं
सकाळपास्नं उपाशीच हायती..."
लक्षी फार थकली होती. नेहमीसारखं काठीवर
उभं राहता येईल की नाही, या विचारानं तिच्या डोक्यात
गोंधळ घातला होता. बानी आणि उमश्या दमून गाठोड्याला टेकून बसली होती. बंड्याच्या
डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं. तरीपण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय
आपणाला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही. आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न
मिळणार नाही. शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत. त्यांच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही.
या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता. आपला धीर खचू नये म्हणून तो उमश्याला
म्हणाला, “ये त्वा ढोलगं वाजीव..."
पेकाळून गेलेल्या उमश्यानं ढोलगं घेतलं,
आणि "ये ये... नवा ख्योळ... नवा ख्योळ" म्हणत वाजवू
लागला.
लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधले.
बंडयानं दोन्ही हातांनी काठी धरली. काठी हालू नये म्हणून सर्व ताकतीने त्याने काठी
मजबूत पकडली. उमश्या जोराजोराने ढोल वाजवू लागला. लक्षी सरसर काठीवर चढली. माणसं
कुतूहलाने त्यांच्याकडं बघू लागली. लहान मुलं त्या गर्दीतून पुढं येण्याची धडपड
करू लागली. मोठी माणसं, बायका टाचा उचलून,
माना वर करून बघू लागल्या. एका पायावर काठीवर कसं उभा राहता
येतंय... हे बघण्याची लोकांची आतुरता वाढत होती. ती काठीवर चढलेली बघून जमलेली
माणसं म्हणू लागली, "शाब्बास! होला म्हंत्याती
कला..."
माणसं श्वास रोखून तिच्याकडं बघू लागली.
लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली.
अशक्तपणानं तिला ग्लानी आली होती. त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूला झुकला. ती
आठ-नऊ फुटांवरून खाली कोसळली.
बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला
आहे,
हे बघून एक माणूस बंड्याला हे म्हणाला, "आरं...
ये... डोंबारीबाबा, आसा समादी लागल्यावाणी का बसलायीच... ?
ती बाय मरून जाईल... त्या वरच्या गल्लीत... कुंडिबा माळी हाय.
त्येला कळतंय. त्यो सुदीवर आणील तिला... आणि हातपाय मोडला अशील तर त्यो
बसीवतुया..."
त्याच्या बोलण्यानं बंड्या भानावर आला.
बंड्या थरथरत उठला. त्या बोलणाच्या माणसाकडं बघत म्हणाला,
"मालक... कुटंशी हाय त्येंचं घर ? तिचा
हात..... मोडलाय... आजून सुदीवर बी यीना...' त्या माणसानं
गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, "जा घिवून
लवकर... न्हायतर मारून टाकचील त्या बिच्चारीला..." डोळ्यातनं येणारं पाणी
पालथ्या हातानं पुसत बंड्या म्हणाला, "जातू... जातू...
बरं झालं तुमी सांगितलं ती मला तर काय कळीनाच झालंय...." बंड्यानं लक्षीला
उचललं. दोन्ही हातांवर आडवं घेतलं. तो वरच्या गल्लीकडं निघाला. बंड्या आपल्या
विचारात चालत होता. त्या माणसानं पैसं मागितलं तर काय करायचं ? खेळ मधीच बंद पडल्यामुळे कोणी पाच-दहा पैसंसुद्धा टाकलं नाहीत. भाकरीच्या
तुकड्यासाठी आपणाला जिवावर बेतणारी कसरत करावी लागतेय. आज भाकरीचं तुकडंही मिळालं
नाहीत.
तो विचारत विचारत कोंडिबा माळ्याच्या
घराकडं चालू लागला. एका घरासमोर उभा राहून क्षीण आवाजात म्हणाला,
"मावशी... हिकडं... कुंडिबा माळ्याचं घर कुटं हाय ?"
घरातून एक बाई बाहेर आली. ती म्हणाली, "हितन
... तिसरं घर... कुंडिबा मामाचं घर हाय... पर ह्या बायला काय झालंय गा ?"
जड पावलानं पुढं जात बंड्या म्हणाला, "ख्योळ
करताना पडल्याया..."
तो कोंडिबाच्या घरासमोर आला. कोंडिबा माळी
शेळीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला,
"मालक... आमी डोंबाऱ्याचं हाय.... सकाळपास्नं पोटाला आन्न
न्हाय... म्हणून ख्योळ कराला गिलू... तर... ही माजी बायकू..."
त्याला पुढं बोलवेना. तो दाटल्या कंठानं
तसाच गप्प राहिला. आशेनं कोंडिबाकड बघू लागला. कोंडिबानं वाकाची दोरी बाजूला
ठेवली. गडबडीनं उठून घरात गेला. घरातून एक घोंगडं आणलं. ते घोंगडं पसरत तो म्हणाला,
“ह्या बयाला खाली झोपीव... आणिक काय काय झालं ती सांगा...'
बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं
आणि जे घडलं ते सांगण्यास सुरुवात केली. कोंडिबा त्याचं ऐकत ऐकत घरात गेला. त्यानं
तांब्याभर पाणी, आणला. तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू
लागला. कांदा फोडून तिच्या नाकाजवळ एक कांदा धरला. बंड्या भरल्या आवाजानं सांगत
होता, "उशीर झाला... ती आजून सुदीवर आली न्हाय. मला
भ्या वाटा लागलंय..."
कोंडिबा पाणी शिंपडत म्हणाला,
"तिला... काय व्हत न्हाय... तिला लय थकवा आलाय... त्यातच
डोस्कं फुटून रगात गेलंय म्हणून ती बेसुद पडल्याया..." दोन्ही पोरं एकटक
आईच्या चेह-याकडे बघू लागली. लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. ती पापण्या
उघडण्याचा प्रयत्न करत होती.
पापण्या उघडल्या,
की अंधारी मारत असल्यामुळं ती परत पापण्या मिटत होती... ती शुद्धीवर
येत असलेली बघून, बंड्यानं सुटकेचा नि:श्वास सोडला. कोंडिबा
तिचा कोपरापासून निखळलेला हात बसवू लागला. शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना
तिला जाणवू लागल्या. ती तडफडू लागली. तिची तडफड बघणं बंड्याला असह्य झालं. बानी
बापाला विचारू लागली,
"बाबा... आय... कसं करा लागल्याय
बग..."
कोंडिबा त्या लहान मुलीकडं बघत म्हणाला,
"त्येला काय व्हत न्हाय बाळ... तुजी आय आता बरी
झाल्याय..."
त्यानं तिचा हात बसवला. एका कापडानं हात
बांधला. लक्षी चांगलीच शुद्धीवर आली होती. ती कसंतरी उठून बसली. दोन्ही मुलं आईला
बिलगून बसली. ती मुलांना कवटाळून रडायला लागली. कोंडिबानं एक फडकं घेतलं. त्यानं
तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या.
कोंडिबा म्हणाला, "आता काय काळजी करू
नगा... ह्येला काय व्हत न्हाय... पर च्यार-पाच दिस या हाताची हालचाल व्हू दिवं
नगा...'
भीतभीतच बंड्यानं विचारलं,
"केवडं पयसं याचं तुमास्नी ?"
कोडवानं त्यांच्यावरून नजर फिरवली.
दुःखाने अगतिकतेने काळवंडलेले चेहरे, त्याच्याकडे
आशेनं बघत होते. सवयीनुसार मान हालवत कोंडिबा बोलू लागला, "तुमी भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताया. समयाम्होरं हात पसरून
पाच धा पयसं गोळा करताया. तुमाकडनं म्या कसं पयसं घ्येवाचं... ?"
बंड्याचं अंत:करण भरून आलं. त्याच्या
डोळ्यांतून टपकन पाणी पडलं. कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला गहिवरून आलं. भिजलेल्या
स्वरात तो म्हणाला, "देवासारखं...
तुम्ही आमाला भेटला... न्हायतर आज माज्या बायकूचं... ह्या लेकरासनीचं काय झालं
असतं... ?"
कोंडिबानं उजवा हात उचलला. त्याच्या
पाठीवर ठेवत म्हणाला, "ही बग, तुला येळ आली म्हणून त्वा माज्या दारात आलाच. न्हायतर आपुन कवा येक
दुसन्याला दिसलू सुदीक नसतू तुज्याकडनं च्यार पयसं घिवून काय माज्या जलमाला पुराचं
हायती व्हय ?" लक्षी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडं
बघतं राहिली. ती म्हणाली, "आजकाल माणसापलं माणूसपणच
ऱ्हायला न्हाय. तुमच्यासारकी माणसं आजून हायती म्हणून तर आमच्यासारक्यांना जगाला
येतंया बगा."
थोड्या वेळाने बंड्याकडे बघून कोडियानं
विचारलं,
"कुटं ऱ्हालाया... ?" त्याबरोबर
बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली. तो गडबडीनं उठत म्हणाला, "आमचं समदं सामान ख्योळ करत्याल्या जागीच पडलंया. आमी निगतू...'
त्यानं कोंडिबाचा निरोप घेतला.
लक्षीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ
लागला. तो मुलांना म्हणाला, "तुमी दोगंजण पळत
म्होरं जावा...."
लक्षी थकल्या स्वरात म्हणाली,
"समदं उगड्यावर इस्काटून पडलं व्हतं. काय झालंया कुणाला ठावं ?"
दोन्ही मुलं पळत पुढं गेली. बंड्या
लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला. तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला. त्यानं
समोर बघितलं, उमश्या आणि बानी इकडं तिकडं शोधत
होती. त्याच्या संसारातील निम्मं अर्ध साहित्य नाहीसं झालं होतं : ते दोघं;
मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मोडलेल्या
हाताकडं पाहात राहिले.
0 Comments