Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी | कथा वीर बापू गायधनी

Marathi Katha मराठी कथा Marathi Story

मराठी गोष्टी कथा वीर बापू गायधनी

आपण सतत मराठी कथा Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी  वाचनीय लेख शोधत असता. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील अतिशय भावनिक कथा पाहणार आहोत. मुलावर संस्कार व्हावेत यासाठी वाचनीय कथागोष्टीवाचनीय लेख वाचन करणे आवश्यक असते. प्रस्तुत उतारा वीर बापूराव गायधनी स्मारक समिती, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या वीर बापूराव गायधनी रौप्यस्मृतिग्रंथ 'परजीवितरक्षण यज्ञ' या पुस्तकातून संकलित करून घेतला आहे. या पाठात दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या 'बापू गायधनी' यांच्या साहसी व वीर वृत्तीचा परिचय करून दिला आहे.

वीर बापू गायधनी


काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग. आजही सर्वांना स्तिमित करून जाणारा आहे. ती एक काळरात्र ठरली होती. दिवसभर दमून रात्रीला विसावा घेणारे जीव गाढ झोपेत असताना एकदम घणाणू घणाणू घंटा वाजू लागली. त्या घणाघाती आवाजाने रात्रीची शांतता दुभंगली. लोक खडबडून जागे झाले. काही खिडक्यांकडे धावले, काही घरांतून बाहेर रस्त्यावर आले. पाहतात तो काय ? समोर एका दुमजली इमारतीला प्रचंड आग लागली होती. त्या इमारतीत अनेक बिह्राडे वास्तव्याला होती. त्या इमारतीत एकच हलकल्लोळ माजला होता. आगीचे लोळ इमारतीत आत आत शिरत होते आणि आतले लोक जीव मुठीत धरून बाहेर धाव घेत होते. आत अडकलेले लोक जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत होते. आगीच्या ज्वाला टाळत मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवत ते रस्त्यावर येत होते. खाली चौकाच्या सोप्यात गाईगुरे बांधलेली होती. जनावरे दाव्याला हिसके मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती.

 

वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती. खिडकीशी येऊन ती मुले सगळी शक्ती एकवटून मदतीसाठी आकांत करत होती. त्यात एव्हाना रस्त्यावर प्रचंड गर्दी गोळा झालेली होती; अग्निशामक दलाची गाडी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती; पण आगीचे प्रचंड लोळ विझवणे अशक्य होत होते.

 

दुसऱ्या मजल्यावर अडकलेली मुले 'आई! आई!' म्हणून आर्त हाक मारत होती. लोकांची हृदये करवतीने कापल्यासारखी घायाळ होत होती; पण करणार काय ? कोण धजणार त्या आगीत शिरायला ? आगीत ? नव्हे मृत्यूच्या जबड्यातच म्हणाना! त्या मुलांची माता बाहेर धावत आलेली होती. ती आपल्या पिलांच्या आर्त हाकेने वेडी झाली. मुलांच्या हाकेला ओ देत ती त्या आगीत शिरायला धावली. लोकांनी तिला अडवले. एकाने तर तिचा हात घट्ट पकडून तिला मागेच खेचले. ती रडत होती, ओरडत होती. वेड्यासारखी एकटक आपल्या त्या पिलांकडे केविलवाणी बघत होती. "वाचवा हो माझ्या पिलांना !" ती ऊर बडवत लोकांना विनवण्या करत होती.. जनसमुदायाचे हृदय विर्दीनं होत होते; पण मृत्यूला उपटया डोळयांनी कवटाळण्याचे धैर्य करून त्या मुलांना वाचवायला कुणी धजेना.

 

तेवढ्यात एक तरुण तिथे धावत आला. अग्निशामक दलाची घणाण् घणाण् आवाज करणारी संकटसूचक घंटा त्याने ऐकली होती. झोप बाजूला सारून तो त्या आग लागलेल्या इमारतीकडे वेगाने आला होता. प्राणिमात्रांवर दया करावी, प्रसंगी आपले प्राण वेचूनदेखील इतर प्राणिमात्रांचे जीव वाचवावेत, ही भूतदया शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीचे जणू बाळकडूच तो प्याला होता. त्याने काचा कसला आणि त्या आगीत तो बाणासारखा शिरला. जनसमुदायाच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच तो तरुण भरभर त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचला. आगीचे चटके आणि कोंदलेल्या धुराने गुदमरणारा श्वास यांची पर्वा न करता तो तरुण त्या मजल्यावर अडकलेल्या मुलांपाशी पोहोचला.


जमलेली बघ्यांची गर्दी थक्क झाली. "कोण हा स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा वेडा तरुण ?" ती गर्दी परस्परांना विचारू लागली. "हा तर बापूराव गायधनी !" कुणीतरी ओरडले, "जिना पेटला आहे. कसा वाचवणार हा त्या मुलांना?" दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेढलेले होते. जिना जळून कोसळला होता. काय करावे? त्या तरुणाने लगेच एकेका गादीत एकेका मुलाला गुंडाळले आणि खिडकीतून लोकांना हाक दिली.

 

"मी या गादीत मुलांना गुंडाळले आहे. झेलून घ्या त्यांना " गर्दीला एकदम भान आले. त्या तरुणाच्या समयसूचकतेचे जनसमुदायाला अपार कौतुक वाटले. त्यांनी वरुन फेकलेल्या गादीतील मुलांना अलगद झेलले. मुले वाचली त्यांची आई आनंदली ! मुलांना पोटाशी घेऊन तो पटापट पापे घेऊ लागली. रडता रडताही तिला आनंद झाला.

पण त्या आत शिरलेल्या तरुणाचे काय ? जनसमुदाय त्या आगीत गुरफटलेल्या तरुणाकडे असहायपणे पाहत होता. 'खरा वीर शोभतोस!' प्रत्येक ओठातून उत्स्फूर्तपणे शब्द फुटत होते. तो तरुण -बापूराव गायधनी - कृतार्थतेने निःश्वास टाकत होता. कृतकृत्य झाल्याचे विलक्षण समाधान त्याच्या चेहन्यावर विलसत होते. त्या पेटलेल्या आगीतून त्याने मुसंडी मारत चाहेर धाव घेतली. बापूरावाचे अंग ठिकठिकाणी भाजून निघाले होते. डोक्याचे केस अर्धवट जळाले होते. चेहरा विद्रूप दिसत होता. जनता त्या वीरापुढे नतमस्तक झाली. त्याला त्वरित दवाखान्यात न्यायला काही लोक पुढे आले.


तोच चौकाच्या सोप्यातून एका गाईचा हंबरडा बापूच्या कानी पडला. बापूचे हृदय त्या हंबरड्याने हेलावले. लोकांच्या अडवण्याला पार झुगारून तो वीर पुन्हा त्या आगीत शिरला. काही करून त्या गाईला वाचवायचे होते.

 

बापूराव गाईजवळ पोहोचला. अंगाला आगीचे चटके बसत होते. काही गुरांना त्याने मोकळे केले; पण एका गाईच्या दाव्याची गाठ सुटेना, काय करावे ? बापूरावाने अंगातले उरलेसुरले सगळे बळ एकवटले आणि आवेशात दावे जोरात ओढले. खुंट्यासहित ते दावे हाती आले. गाय मोकळी झाली. गाईला वाचवून त्या तरुणाने आपले 'गायधनी' हे आडनाव सार्थ केले. आगीच्या भयंकर जखमांनी विव्हळणारा

बापूराव त्या अग्निप्रलयातून पुन्हा बाहेर आला. आपल्या पिलांना पोटाशी घेऊन ती . माता बापूरावाकडे कृतज्ञतेने बघत होती. त्यांना वाचवणारा तो देवदूत जवळ येताच ती माता डोळ्यांत आसवे आणून त्याच्याकडे पाहत राहिली. ती माता त्या तरुणापुढे वाकणार, तोच बापूराव बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

 

गर्दीतील काही लोकांनी त्याला उचलले. गर्दी हटवत दवाखान्यात नेले. बापूराव खूपच जळाला होता. त्याची शुद्ध हरपली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली; पण भयंकर जखमांनी विव्हळणाऱ्या बापूरावाला ते वाचवू शकले नाहीत. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण बापूरावाने वेचले. भूतदयेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीची शान बापूरावाने राखली. बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला.

 

सारे नाशिक शहर हळहळले. कुणालाही कित्येक दिवस अन्न गोड लागले नाही. सगळ्या शहरालाच जणू सुतक पडले होते. लोक त्या वीराच्या बहादुरीचे पवाडे गात होते. लोकांनी बापूराव गायधनीचे उचित स्मारक नाशकात उभारले. 'वीर' ही बहुमानाची पदवी दिली. महात्मा गांधींनीदेखील हे वृत्त कळताच 'धन्य त्याचे माता पिता' म्हणून गायधनी कुटुंबाची प्रशंसा केली. त्या वीराच्या मृत्यूने महात्माही हळहळला !

 

आत्मबलिदानाने इतरांचे जीवन वाचवणारा बापूराव गायधनी, वीर बापूराव गायधनी म्हणून जनतेच्या अंतःकरणात आदराचे स्थान कायमचे मिळवून गेला.

 

नाशिक येथे वीर बापूराव गायधनी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी वीर व साहसी व्यक्तीला पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो. धन्य भारत देश आणि धन्य ती भूतदया शिकवणारी भारतीय संस्कृती !


Post a Comment

0 Comments